भाईंदर : मिरारोड पोलीस ठाणे हद्दीत टाटा कॅपिटल कंपनीचा बँक अधिकारी असल्याचे भासवुन व्यवसायिक कर्ज मंजुर करुन देतो असे सांगुन दुकानदारांची फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना मिरारोड पोलिसांनी अटक केली आहे.
मिरारोड पोलीस ठाणे हद्दीतील दीप सागर दुकानाचे मालक सागर रोहिदास काळे हे ३ एप्रिल २०२३ रोजी दुकानात असतांना एक इसम त्यांचे दुकानात आला व त्याने तो टाटा कॅपीटल बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यावेळी बिझनेस लोन मंजूर करून देतो असे सांगुन काळे यांच्याकडून एच.डी.एफ.सी बँकेचे कॅन्सल चेक घेतले. ते कॅन्सल चेक बँकेत वटवून काळे यांची १,१८,००० रुपयाची फसवणुक केल्याबाबत मिरारोड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी मिरारोड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना करून विशेष शोध पथक नेमण्यात आले होते.
या गुन्हयाच्या तपासादरम्यान मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयात आरोपीनी वापरलेल्या मोबाईलचे विश्लेषण केले असता गुन्हयातील आरोपी हे एक मोबाईल नंबर फक्त दोन ते तीन दिवस गुन्हा करण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे आरोपी यांचा शोध घेणे अवघड झाले होते. या गुन्हयातील आरोपी यांनी वापरलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलचे आयएमईआय क्रमांकावर पाळत ठेवली असता १४ जून २०२३ रोजी गुन्हयातील आरोपी हे अहमदनगर याठिकाणी गुन्हे करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. आरोपी पळून जावू नये म्हणून आरोपीबाबत अहमदनगर येथील स्थानिक दुकानदारास माहिती देवून स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीना पकडण्यात आले.
सदर गुन्हयात आरोपी मोहम्मद अब्दुल कुहुरा मेहबुब, रा. उर्दू शाळेजवळ, ता. लखना, जि. हजारीबब, झारखंड, एतेशाम एमडीनईम आलम, रा. ईचारण, घोसलाई, कोलकत्ता, अजीज लतीफ शेख, रा. मोमीनपुर रोड, कोलकत्ता, मुकेशकुमार दुर्वाधन नायक, रा. एसीजी बोस रोड, कोलकत्ता, गंगा लक्ष्मी साहू, रा. सोनारपुर, परगाना, कोलकता यांचा मिरारोड पोलीस ठाणेत दाखल असलेल्या गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
१८ जून २०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून अशा प्रकारचे गुन्हे मिरा भाईंदर, वसई, विरार, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, अहमदनगर, नाशिक, नागपुर तसेच तेलंगणा व गुजरात राज्यात केले असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपींनी नवघर पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे, रामदासपेठ, अकोला पोलीस ठाणे येथे केलेले ३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.