ठाणे: धर्मवीर क्रीडा संस्था अंतर्गत शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉलमध्ये पहिल्यांदाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ठाणे शहरातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते.
धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धा ९ वर्षांखालील मुले व मुली, ११ वर्षांखालील मुले व मुली व १३ वर्षांखालील मुले व मुली आणि खुल्या वयोगटांमध्ये खेळवण्यात आल्या. अतिशय उत्साहाने नियमित सराव करण्याऱ्या ४५ वर्षांवरील मास्टर्स वयोगटाच्या खेळाडूंचा देखील यात सहभाग होता. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटन प्रेमींना अनेक रोमहर्षक सामान्यांचा आस्वाद घेता आला.
९ वर्षांखालील मुलांमध्ये योहान नायर या छोट्या खेळाडूने चिकाटी आणि आत्मविश्वास या गुणांचे प्रदर्शन करून विजेतेपद पटकावले आणि पवित्रन बालाजी हा उपविजेता ठरला. तर मुलींमध्ये खनक कर्डे हिने अजिंक्यपद पटकावले तर अलिषा कुकरेजा ही उपविजेतेपदाची मानकरी ठरली. ठाणे अकॅडमीच्या या छोट्या खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांचीच मने जिंकली. ११ वर्षांखालील मुलांमध्ये एल्फी एम. हा विजेता ठरला व अरीन गुप्ते उपविजेता ठरला आणि मुलींमध्ये प्रांजल पाटीलने बाजी मारली तर शनाया तवाते ही उपविजेती ठरली.
१३ वर्षांखालील वयोगटात अनेक चुरशीचे सामने अनुभवयास मिळाले. त्यात रेवांत शृंगारपुरे अजिंक्यविर ठरला तर एल्फी एम. हा उपविजेता ठरला. मुलींमध्ये अश्र्विका नायर हिने बाजी मारली व गीत नाखरेला रौप्यपदक प्राप्त झाले. खुल्या गटात श्लोक चौधरी सुवर्ण पदाचा मानकरी ठरला आणि वरद सरवटे याने रौप्य पदक पटकावले. ४५ वर्षांवरील गटात दुहेरीत खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये अविनाश गोडे आणि अविनाश गोरांतीला या जोडीने उत्तम कामगिरी करीत अटीतटीच्या सामन्यात संदीप सक्सेना आणि अनुराग भंडारकर या जोडीला हरवून अजिंक्यपद पटकावले. या गटातील सर्व खेळाडूंनी खेळाला वयाची सीमा नसते हे आपल्या उत्तम कामगिरीने दाखवून दिले.
स्पर्धेसाठी संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली होती. यापुढे दर ३-४ महिन्यांनी आपण असे सामने आयोजित करू आणि खेळाडूंना अजून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू असा मानस या दोघांनी आणि अध्यक्ष श्रीकांत वाड यांनी व्यक्त केला. धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि क्रीडा अधिकारी मिनल पालांडे व ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने देखील खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि कौतुक केले आहे.