थंडीच्या कडाक्याने गुळाची मागणी वाढली, दर मात्र स्थिरच

नवी मुंबई: थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारा व आरोग्यास गुळ हा फायदेशीर मानला जातो. त्यामुळे या दिवसात गुळाचे पदार्थ अधिक बनवले जात असून मकर संक्रांतीला त्याचा वापर अधिक होतो. त्यामुळे बाजारपेठांमध्ये आतापासूनच गुळाची विक्री चांगलीच वाढली आहे.

हिवाळ्याची चाहूल लागताच गुळाच्या मागणीत लक्षणीय वाढ होते. विशेषतः पातळ पोळी, भाजी, तिळगूळ, चहा व औषधी उपयोगासाठी गुळाचा वापर वाढल्याने किरकोळ व घाऊक बाजारात उलाढाल वाढली आहे. सध्या सेंद्रिय व देशी गुळाला अधिक मागणी असून, दर्जेदार गुळासाठी ग्राहक थोडी जास्त किंमत मोजण्यासही तयार आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते, मागणी वाढल्याने गुळाच्या दरात सौम्य वाढ झाली असली तरी पुढील काही आठवड्यांत दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने बाजारात नव्या गुळाची आवक वाढत असून, त्यामुळे ग्राहकांना ताजा गूळ उपलब्ध होत आहे. आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता आणि हिवाळी पदार्थांची मागणी यामुळे यंदा गुळाचा बाजार तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. पुढच्या महिन्यात मकर संक्रांत असल्याने गुळाच्या मागणीत आणखीन वाढ होणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याने गुळाला अधिक प्राधान्य दिले जाते.

एपीएमसी घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा गूळ ५० ते ५८ रुपये दराने विकला जातो तर कमी प्रतीचा गूळ ४२ ते ४४ रुपये प्रति किलोने विकला जातो. बाजारात येणारा गूळ सातारा, सांगली तसेच कोल्हापूर या जिल्ह्यातून येतो. सद्यस्थितीत गुळाचा पुरवठा पाहता दर वाढले नसून मागणी अधिक वाढली असल्याचे घाऊक व्यापारी प्रशांत मेहता यांनी सांगितले.