ठाण्यात भाजपला हव्यात खात्रीलायक ५५ जागा!

पक्षश्रेष्ठींकडे दिला प्रस्ताव

ले आऊटमध्ये ५ नंबरला

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकारणीने ५५ जागांची मागणी करणारा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असून या प्रस्तावावर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युतीबाबत बोलणी सुरु आहेत, परंतु त्याबाबत कोणताही निर्णय अजूनही झालेला नाही. भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेबरोबर युती करण्यास विरोध दर्शवला आहे, परंतु महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यासह राज्यातील सर्व महापालिकेत महायुती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने भाजपाच्या स्थानिक कार्यकारिणीने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून युतीकरिता निवडून येणाऱ्या ५२ ते ५५ जागांचा प्रस्ताव पाठविला असून सुमारे ४० टक्के जागांची मागणी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा करताना त्यांनी या जागांकरिता आग्रह धरावा, अशी विनंती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

महापालिका हद्दीत मागिल सात ते आठ वर्षांपासून ताकद वाढली आहे. सध्या आमचे २४ नगरसेवक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामामुळे भाजपाचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी घराघरात पोहचले आहेत, त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये भाजपाला किमान ४० टक्के प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना असून जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी करणे हे चुकीचे नाही. महायुतीमध्ये किती जागा भाजपाच्या पदरात द्याव्यात हा निर्णय प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे ठाणे शहर भाजपा अध्यक्ष ॲड. संदीप लेले यांनी सांगितले. महापालिकेच्या १२९ प्रभागांत सुमारे ५३९ कार्यकर्ते इच्छुक असल्याचे श्री.लेले म्हणाले.