सदोष प्रभाग आराखडा; महायुतीत मिठाचा खडा!

* भाजपची ताकद असलेले भाग जोडले शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागाला
* भाजपकडून १००हून जास्त हरकती

ठाणे: राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुती असतानाही ठाणे महापालिकेचा प्रभाग आराखडा तयार करताना भाजपाच्या हक्काची मते असलेला भाग शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागाला जोडल्याने भाजपाच्या तब्बल १००पेक्षा जास्त जणांनी प्रभाग आराखड्याविरोधात हरकत नोंदवून आपला रोष व्यक्त केला आहे.

अगामी ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रभाग आराखडा महापालिकेने प्रसिद्ध केला असून त्या आराखड्याविरोधातील हरकत आणि सूचनांवर आज सुनावणी घेण्यात आली. घोडबंदर मार्गांवरील कोलशेत भागातील प्रभाग क्रमांक ३ आणि प्रभाग क्र ८च्या प्रभाग रचनेवर या भागातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. ढोकाळीचा भाग हा मानपाड्यामध्ये टाकण्यात आला आहे. तर ढोकाळी येथिल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना हा भाग कोलशेतमध्येच असावा, अशी त्यांची मागणी आहे. मनोहर डुंबरे यांच्या प्रभागात हिरानंदानीचा काही भाग जोडण्यात आला आहे. खोपट प्रभागाला तलावपाळीचा परिसर जोडण्यात आला आहे. दिवा भागातील भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही, अशी प्रभाग रचना सत्ताधारी पक्षाने केली असल्याने या परिसरातील सुमारे ७० ते ८० हरकती एकट्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे विजय भोईर यांनी सांगितले.
ही प्रभाग रचना फक्त शिवसेना शिंदे गटाच्या फायद्याची असून युतीमध्ये असतानाही भाजपाच्या एकाही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेवकाने केला. वृंदावन-श्रीरंग हा प्रभाग तयार करताना भाजपाची पारंपारिक मते त्यांना मिळणार नाहीत, शिवसेनेचे मताधिक्य वाढेल याची काळजी घेऊन हा प्रभाग तयार करण्यात आला असल्याचा आरोप भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने केला.

राज्यात महायुतीचे सरकार असून महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार असे महायुतीचे नेते घोषणा करत असले तरी प्रभाग रचना तयार करताना शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या सोयीचा प्रभाग आराखडा तयार केला, असा आरोप भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने केला.

प्रभाग समितीनिहाय हरकती आणि सूचना

माजिवडा-मानपाडा: ५९, दिवा: १२२, मुंब्रा: ८, कळवा: ४, वागळे: १, नौपाडा-कोपरी: ४३, लोकमान्य-सावरकरनगर: ३, उथळसर: १७, वर्तकनगर: १३
एकूण: २७०