आराखड्यात मतांची पळवापळवी

महाविकासआघाडीचा आरोप

ठाणे: ठाणे महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग रचना सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली केली आहे. नगरसेवकांची चोरी करण्याच्या हेतूने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना डोळ्यासमोर ठेऊन आराखडा तयार करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करत या प्रभाग रचनेला कडाडून विरोध केला.

निवडणूक विभागाने नियुक्त केलेले माजी आयुक्त संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सुनावणी दरम्यान प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला.

महापालिका अधिकाऱ्यांनी प्रगणक गटांची माहिती दिली नाही. किती लोकसंख्येचा एक प्रगणक गट आहे, याची कल्पना कोणालाही नाही त्यामुळे निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि मोकळ्या वातावरणात होणे अपेक्षित असून निवडणूक विभागाच्या तत्वाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे. प्रभाग रचना करताना दहा टक्के जास्त किंवा कमी लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग रचना करणे आवश्यक असतानाही अनेक प्रभागातील लोकसंख्या १००टक्क्यांपेक्षा जास्त झाली असल्याचे आ. डॉ आव्हाड यांनी सप्रमाण दाखवून तसेच सीमा निश्चित करताना पाच किलोमीटर इतक्या अंतराचा प्रभाग तयार करण्यात आला असून येऊर या प्रभागात कोकणी पाडा याचा समावेश केल्याबाबत त्यांनी हरकत घेतली. कोलशेत येथिल खालचा गाव आणि वरचा गाव यांना दोन प्रभागात विभागले आहे तर अनेक ठिकाणी कोळीवाड्याचे देखिल दोन तुकडे केले असल्याचे डॉ.आव्हाड यांनी निदर्शनास आणले. कळवा-मुंब्रा या भागातील लोकसंख्येनुसार येथिल चार नगरसेवकांची संख्या कमी करून ती ठाण्यात वाढविण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिवा येथिल नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी तेथे दोन नगरसेवक वाढविल्याचे डॉ.आव्हाड म्हणाले.

काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी प्रभाग रचना करताना दिशाभूल केल्याचे सांगत अनेक प्रभागांच्या सीमा बदलल्या असून अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बसून ही प्रभाग रचना केल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे अविनाश जाधव यांनी हरकत आणि सूचना घेण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ज्यावेळी प्रभाग रचना जाहीर झाली, त्यावेळी गणेशोत्सव होता. त्यामुळे अनेकांना हरकत घेता आली नाही. ही प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी करण्यात आली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली आहे. सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींनी हरकत घेतली आहे. फक्त शिवसेना शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी हरकत घेतली नाही. म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी ही प्रभाग रचना केली असल्याचा आरोप श्री. जाधव यांनी केला. श्री.सेठी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या सर्व हरकतींवर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी हरकत घेतलेले सुमारे दोनशे तक्रारदार हे बाहेर होते. त्यांनी या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला प्रथम सुनावणीकरिता बोलावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
दरम्यान अनेक हरकती घेणाऱ्यांनी सुनावणीबद्दल शंका उपस्थित केली. सुनावणीचा फक्त फार्स करू नका. आमच्या हरकतींवर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी खा. राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव, रविंद्र मोरे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, शिवसेना उबाठाचे केदार दिघे, राष्ट्रवादीचे सुहास देसाई, भाजपाचे मनोहर डुंबरे, नारायण पवार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.