रुग्णालयातील पाण्याच्या मशिनमध्ये मृत उंदीर

नवी मुंबई: वाशी येथील नवी मुंबई महापालिका रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ठेवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मशीनमध्ये मृत उंदीर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वाशीतील मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या नसरीन पठाण यांच्या नातेवाईक फरहान वागू यांनी पाणी स्वच्छ आहे का हे पाहण्यासाठी मशीनचे झाकण उघडले असता आतमध्ये मृत उंदीर दिसून आला. यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या नागरिकालाच ड्युटीवरील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावीची भाषा वापरण्यात आली. या गंभीर प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर मतदारसंघाचे उपजिल्हा प्रमुख तथा ऐरोली मतदारसंघाचे शहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी व वाशी मनपा रुग्णालय अधिक्षक डॉ.राजेश म्हात्रे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.