दोन वर्षांच्या बालिकेला जन्मजात दोन मोतीबिंदू; सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी

ठाणे : नाशिक इगतपुरी परिसरात राहणा-या एका दोन वर्षाच्या मुलीला डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. कारण, या बालिकेला दोन्ही डोळ्यांना जन्मजात मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे तिचे पालक कमालीचे हवालदिल झाले होते. परंतु, ठाणे शासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाचे आव्हान पेलले आणि तिची शस्त्रक्रिया यशस्वी करुन दर्शवली.

या दोन वर्षाच्या मुलीला डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. केवळ प्रकाशाची संवेदना तिला समजत होती. नाशिक परिसरातील रुग्णालयांमध्ये मुलीच्या डोळ्यांची तपासणी केल्यानंतर तिला मोतीबिंदू झाला असल्याचे स्पष्ट झाले. सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुठे करावी असा जटील प्रश्न तिच्या पालकांसमोर होता.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मुलीची शारीरिक तपासणी करून घेतली होती. आठवडाभर या मुलीला रुग्णालयातच उपचार सुरू होते. बुधवारी मुलीच्या डोळ्यांवर लेझर मशिनद्वारे शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया काही मिनिटांची असली तरी रुग्णालयासाठी हे मोठे आव्हान होते. मात्र, सिव्हील रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याची माहिती त्यांना कळल्यानंतर त्यांनी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. नंतर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज माहांगडे यांच्या मार्गदशार्खाली मुलीच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली असल्याची माहिती नेत्र सर्जन डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठी गोष्ट आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी म्हणाले. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ.रुपाली यादव आणि अन्य वैद्यकीय कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.