ठाण्यात मागेल त्याला काजू कलमे

कृषी विभागाची मोहीम

ठाणे : कृषी विभागाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत “मागेल त्याला काजू कलमे” ही विशेष मोहीम ठाणे जिल्ह्यात हाती घेतली आहे. हवामान बदलाच्या या काळात कमी पाण्यात आणि कमी खर्चात दीर्घकालीन उत्पन्न देणारा एक सुरक्षित पर्याय म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ, उताराच्या तसेच हलक्या व पडीक जमिनींमध्ये काजू लागवड अत्यंत यशस्वी ठरत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

सध्या भारतात १०.६२ लाख हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड केली जात असून त्यातून वार्षिक ८.१७ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन मिळते. या उत्पादनात महाराष्ट्राचा, विशेषतः कोकणाचा मोठा वाटा आहे. हीच उत्पादकता आणि क्षेत्र आणखी वाढवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी व आधार नोंदणीकृत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट केले जाणार आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ७/१२ उताऱ्यावर अनेक खातेदार असून स्थानिक वास्तव्याअभावी सहमती मिळणे कठीण असल्यास, प्रत्यक्ष जमीन वापरणाऱ्या स्थानिक शेतकऱ्याला किंवा वारसदाराला या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे. याशिवाय वनपट्टेधारक शेतकरी आणि १० वर्षांपूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थीदेखील यास पात्र ठरणार आहेत.

या योजनेअंतर्गत सहभागी लाभार्थ्याला प्रति व्यक्ती किमान १० आणि कमाल ५० काजू कलमे मोफत पुरवली जाणार आहेत. कृषी विभागातर्फे दिली जाणारी ही कलमे स्थानिक हवामानाशी सुसंगत, सुधारित आणि उच्च उत्पादनक्षम वाणाची असून त्यांची बाजारपेठेतील किंमत ७० रुपये प्रति कलम इतकी आहे. शेतकरी आपल्या मोकळ्या पडीक जमिनीसह शेताच्या बांधावरही ही कलमे लावू शकतात.