ग्रामीण भागात डॉ. अमोल गित्ते यांचा पुढाकार
ठाणे : शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे असलेल्या अद्ययावत आरोग्य सुविधा असलेल्या क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये सुसज्ज हृदयरोग विभाग (कॅथलॅब) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहापूरसारख्या ग्रामीण आदिवासी बहुल तालुक्यातील रुग्णांना एन्जोग्राफी व एन्जोप्लास्टि करण्यासाठी ठाणे, मुंबई नाशिक या सारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.
वाढत्या हृदय विकाराच्या घटना लक्षात घेऊन क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल गित्ते यांनी शहापूरसारख्या अतिदुर्गम भागात कॅथलॅब सुरू करण्याचा मानस बाळगला होता. डॉ. अमोल गित्ते यांनी सामाजिक बांधीलकी जपत ग्रामीण भागात अशी सेवा उपलब्ध केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
कसारापासून कल्याणपर्यंत अशी सुविधा असलेले एकही हॉस्पिटल नसल्याने गोल्डन अवरमध्ये ट्रीटमेंट मिळत नव्हती आणि त्यामुळे हृदय विकाराच्या घटना आणि यामधून होणारे मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज कॅथलॅब आरोग्य युनिटची स्थापना या ग्रामीण भागात केल्याचे डॉ. गित्ते यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात हृदय विकाराने अनेक तरुण-तरुणी तसेच मध्यम वयस्क नागरिक, आबालवृध्द यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.या कॅथलॅबमुळे शहापुरातील हृदय रोगाने पीडित रुग्णांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी शहापूर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आयएमए संघटनेचे सचिव डॉ.विलास सुरोशे, कुणबी महोत्सवचे अध्यक्ष किरण सोकांडे, कार्डिओलाॅजिस्ट डॉ.भरत जैन, क्रिस्टल केअरचे मुख्य प्रशासक डॉ.प्रवीण कांगणे, कॅथलॅब मॅनेजर सुमित बागुल, कॅथलॅब प्रभारी हरीश जैन, सिनियर ॲडमीन सत्यमूर्ती आदी मान्यवरांसह वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.