सी. डी. देशमुख संस्थेचा विद्यार्थी सीबीएसई अध्यक्षपदी

ठाणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी 2001 बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशांत लोखंडे हे ठाणे महानगरपालिकेच्या कै. सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रशासकीय सेवेत प्रवेशासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण त्यांनी या संस्थेतून घेतले होते. त्यांच्या या यशामुळे संस्थेचे माजी विद्यार्थी, प्रशिक्षक तसेच ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सन 1995 मध्ये त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता.

ठाण्यातील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतून घडलेला विद्यार्थी देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मंडळाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार असल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

प्रशांत लोखंडे हे एजीएमयूटी (AGMUT) कॅडरचे 2001 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत होते.

सीबीएसईच्या सर्वोच्च पदावर मराठी अधिकारी विराजमान झाल्याने राज्यासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.