नौपाडा पोलिसांची कामगिरी
ठाणे: रिक्षामध्ये हरवलेले १५ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे १५ तोळे सोने तक्रारदार महिलेला अवघ्या २४ तासांच्या आता परत मिळवून दिल्याबद्दल नौपाडा पोलिसांचे कौतुक होत आहे.
खारीगाव येथे राहणाऱ्या वंदना म्हात्रे या काल अधिक महिना असल्याने पाचपाखाडी भागातील तुळजा भवानी मंदिर येथे त्यांच्या दोन बहिणींसोबत देवीची ओटी भरण्यासाठी आल्या होत्या. खारीगाव येथून त्या रिक्षाने तुळजा भवानी मंदिर येथे आल्या होत्या. देवीच्या दर्शनाकरिता मोठी रांग होती. रांगेत त्या उभ्या असतानाच त्यांना सोन्याचे दागिने ठेवलेल्या बॅगेची आठवण झाली, परंतु ती बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलांनी नौपाडा पोलिस ठाण्यात सोन्याचे दागिने हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे, पोलिस हवालदार विलास देसाई, पोलिस शिपाई सारंग कागणे आणि अनिकेत उभे यांच्या पथकाने तक्रारदार महिला ज्या रिक्षात बसली होती त्या रिक्षाचा खारीगाव ते तुळजा भवानी मंदिर दरम्यानच्या ७० ते ८० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून रिक्षा मालक राजू साव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. आज परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्या महिलेला तिचे दागिने परत केले. या महिलेने पोलिसांचे आभार मानले.