धर्मांतर प्रकरणी सत्य बाहेर आणा; अन्यथा मुंब्रा बंद

डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

ठाणे: गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या धार्मिक विद्वेषातून शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा तर मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहेच; शिवाय, हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव आहे. हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? आपण गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱ्याला जाहीर आव्हान देत आहोत की त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱ्या मुलांची नावे-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावीत. जर, खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करीत होते? हा प्रकार म्हणजे एका शहराला बदनाम करुन त्याची अर्थव्यवस्था धुळीस मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

सध्या मुंब्रा, कौसा, शिळ या भागात पाच कोटी चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असतानाच अशा खोट्या बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मांतराची ही बातमी खोटी आहेच; पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे? महाराष्टाची निवडणूक जिंकायची आहे म्हणून खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, जो कोणी धर्मद्वेष पसरविणारे भाषण करेल. त्याच्या विरोधात तक्रार आली नाही तरी पोलिसांनी त्या भाषणावर त्वरीत गुन्हा दाखल करावा. ठाणे पोलिसांनी आजवर का गुन्हा दाखल केला नाही. हा गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांना निल़ंबित करणार का? असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता. सुदैवाने ते त्यांच्या हाती लागले नाहीत म्हणून बचावले. भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी ठाण्यात कट रचले जात असतील तर काय होणार या शहराचे? , असा सवाल डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला.