तिचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले, मिक्सरला बारीक केले

मीरारोडच्या मर्डर मिस्ट्रीने देश हादरला!

मीरा रोड: दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर मुंबईजवळच्या मिरारोडमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपीने हत्येसाठी वापरलेले सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

मीरा-भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीच्या ‘जे’ विंगमधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही निर्घृण घटना घडली. या इमारतीतील घरात मनोज साने (56) आणि त्याची लिव इन पार्टनर मयत सरस्वती वैद्य (32) हे दोघे राहत होते. 2017 पासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं जास्त कुणाशी बोलत नव्हते. सोसायटीच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होत नसे.

दोघेही सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना दिसायचे. संध्याकाळी बाहेर आल्यावर सोसायटीच्या परिसरातील कुत्र्यांना बिस्किट वैगेर खाऊ घालायचे. सोसायटीच्या सचिवाने सांगितल्याप्रमाणे, मनोज बोरीवली येथे दुकानात काम करायचा. तर सरस्वती ही घरीच असायची.

विकृत मनोजने लिव इन पार्टनर सरस्वतीची हत्या 4 जून रोजी केली होती. हा नराधम सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट तब्बल तीन दिवस लावत होता.

इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या खोलीमधून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली आणि नयानगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. नयानगर पोलिसांनी सायंकाळी आठच्या सुमारास घरात प्रवेश केला, त्यावेळी या भयानक घटनेचा खुलासा झाला. घटनास्थळावरुन आरोपी मनोज साने याला ताब्यात घेतले. पोलिसांसोबत काही तक्रारदार शेजारीही घरात गेले होते. त्यावेळी तीन बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते. सोबतच झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणारी कटर मशीनही होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली..दरम्यान, नयानगर पोलिसांनी मनोज साने याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटकही केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज साने आणि मृत सरस्वती वैद्यचे अधूनमधून किरकोळ कारणावरुन भांडण होत होते. मनोज हा पूर्वी बोरीवली येथे राहत होता. 2014 पासून तो बोरीवलीच्या एका रेशनिंग दुकानात काम करायचा. तिथेच त्याची सरस्वतीशी ओळख झाली. सरस्वती ही बोरीवलीच्या अनाथालयात होती. तिचे आई-वडील नाहीत. तर मनोजचेही आई-वडील नाहीत. बोरीवली येथे त्याचे चुलते राहतात. मनोजने 2017 साली मिरारोडच्या गीता आशादिप येथे रुम भाड्याने घेतली होती आणि तिथे दोघे लिव इन रिलेशिनशिपमध्ये राहत होते.

सगळे चांगले चाललेले असताना या दोघांत मध्यतंरी किरकोळ कारणावरुन भांडणे होत होती. त्यात मनोजचे रेशनिंग दुकानाचे काम बंद झाले होते. तो घरीच होता. 4 जून रोजी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. यातून मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने झाड कापण्याचे कटर मशीन घेऊन आला. सरस्वतीच्या संपूर्ण शरीराचे तुकडे तुकडे केले. एवढेच नाही तर तिचे शीरही मनोजने सोडले नाही. त्याने सरस्वतीच्या शीराचेही कटर मशीनच्या मदतीने तुकडे केले. पोलिसांनी सध्या घटनास्थळावरुन मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

आरोपी मनोजने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत सरस्वती वैद्य हिने 4 जूनला विष पिऊन आपले जीवन संपवले होते. तिच्या आत्महत्येस आपल्याला कारणीभूत पोलीस ठरवतील या भितीने त्याने मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची ही शक्कल लढवली. मात्र पोलिसांनी प्रथमदर्शनी आरोपी विरोधात भादवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने काही मृतदेहाचे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. त्या तुकड्यांचा शोधही पोलीस आता घेणार आहेत. पोलिसांनी रात्री उशीरा हत्येसाठी वापरण्यात आलेले घरातील सर्व सामान, तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणारी बाईकही जप्त केली आहे. सध्या या प्रकरणी अधिकृत माहिती देण्यास पोलीस टाळत आहेत. पोलिसांचा याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.