भुजबळ बोलले आणि वातावरण तापले
ठाणे : मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. शरद पवार गटाने भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तर त्यास प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
बीडमध्ये आयोजित उत्तरसभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या वक्तव्यानंतर ठाण्यात मात्र राष्ट्रावादीच्या दोन्ही गटात संघर्ष पाहायला मिळाला. जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांचा गद्दार असा उल्लेख करीत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला.
या आंदोलनामुळे अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही संतप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते वआणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळसाहेब झिंदाबाद, एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरु वाघमारे, ठामपा परिवहन सदस्य मोहसीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले होते भुजबळ?
२०१९ मध्ये अजित दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तुम्ही सांगितलं की ती गुगली होती. ही कसली गुगली? स्वतःच्याच प्लेअरला आऊट करायचं का? राजकारणात अशा गुगल्या असतात का? इकडून गाडी बारामतीहून फिरून आली की अजितदादा आमचे नेते आहेत, असे म्हणायचे. आमच्याविरोधात सभा झाल्यानंतर बारामतीचा प्रश्न आला की अजित पवार आमचे नेते आहेत असे शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणणार. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊन टाका आणि मिटवून टाका भांडण, नेते आहेत ना तुमचे! असंही छगन भुजबळ म्हणाले होते.