सत्ताधाऱ्यांचा डाव, विरोधकांचा आरोप
ठाणे: ठाणे महापालिकेच्या नव्या प्रारूप आराखड्यानुसार आठ प्रभाग हे ६० हजारहून अधिक लोकसंख्येचे असताना त्या तुलनेत नगरसेवकांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. या प्रभागांत ताकद नसल्यानेच सत्ताधाऱ्यांनी हा डाव टाकल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागला आहे.
ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा २०१७ च्याच धर्तीवरचा आहे. त्यामुळे चार सदस्यांचे ३२ तर तीन सदस्यांचा एक असे ३३ प्रभाग तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडून येणार्या नगरसेवकांची संख्याही १३१ इतकीच असणार आहे.
२०११च्या जनगणनेनुसार १८ लाख लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. वास्तविक गेल्या १५ वर्षांमध्ये ठाण्यात झपाट्याने नागरिकरण झाले असून नवीन ठाणे म्हणून ओळख असलेला घोडबंदर पट्ट्याची लोकसंख्या चौपटीने वाढली आहे. या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून मतदार संख्याही त्या तुलनेत वाढली आहे. तर दुसरीकडे कळवा, खारीगाव, मुंब्रा आणि दिवा या उपशहरांमध्येही लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार येथे नगरसेवकांंची संख्या वाढणे अपेक्षित होते. पण आधीच्याच पॅर्टननुसार निवडणूक लढवण्यात येणार असल्याने प्रभागांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे ३३ प्रभागांपैकी आठ प्रभागांमध्ये लोकसंख्या ही ६० हजारांच्या पुढे गेली आहे. तर काही प्रभागांमध्ये लोकसंख्या ही ५७ ते ५९ हजारांच्या घरात आहे.
१८ लाख लोकसंख्या ग्राह्य धरल्यास चार सदस्य पॅनल तयार करताना किमान ४५ ते ५५ हजार लोकसंख्या असलेला एक पॅनल तयार होणे अपेक्षित आहे. जिथे सर्वाधिक लोकसंख्या आहे, तो पट्टा सत्ताधार्यांसाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे नगरसेवकांची संख्या सिमित ठेवण्यासाठी प्रभाग फुगीर करण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कळव्यातील अशा प्रभागांवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
अगामी महापालिका निवडणुकीत ठाणे महापालिकेच्या आठ प्रभागांची लोकसंख्या साठ हजारपार झाली असून या प्रभागातील मतदार संख्या देखिल मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे उमेदवारांची निवडणुकीत मोठी दमछाक होणार असल्याने आत्तापासून इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेले प्रभाग
* प्रभाग क्रमांक ६: लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, रामबाग, लोकसंख्या: ६०२८४
* प्रभाग ९: पारसिक नगर, संघवी हिल्स, आनंद विहार, सह्याद्री, खारीगाव, लोकसंख्या: ६२२६८
* प्रभाग १५: इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, जयभवानी नगर, लोकसंख्या-६११८६
* प्रभाग २३: कळवा, मनिषा नगर, जानकीनगर, लोकसंख्या- ६१७४२
– प्रभाग २४: विटावा, भोलानगर, आनंदनगर, गणपतीपाडा लोकसंख्या-६२५१९
– प्रभाग २५: पौंडपाडा, आतकोनेश्वर नगर, घोलाईनगर, अपर्णा राज सोसयाटी, कोकणेश्वर सोसायटी: लोकसंख्या-६२६९८
– प्रभाग ३०: किस्मत कॉलनी, लोकसंख्या-६०१०५
– प्रभाग ३३: चनी पाडा, देवरीपाडा, रशीद कंपाऊंड, लोकसंख्या-६१०७७
– प्रभाग क्रमांक २: हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रम्हांड, अकबर कॅम्प, लोकसंख्या- ५८२१५
– प्रभाग ७: वर्तकनगर, रेमंड, समतानगर, ओसवाल पार्क: लोकसंख्या-५८३९३
– प्रभाग ३२: नशेमन कॉलनी, मक्सद नगर, वफा हील्स, अॅकार्ड कॉम्पेक्स, सोनाजी नगर, लोकसंख्या-५९५७९