कल्याण-डोंबिवलीत १० प्रभागांत बिग फाईट

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची लढत मानून उमेदवार मैदानात उतरवले असून, काही प्रभागांत ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र आहे.

डोंबिवलीतील पॅनेल 29 हा यंदाच्या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा प्रभाग ठरला आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील-रविंद्र पाटील हे बंधू भाजपच्या उमेदवाराविरोधात थेट लढत देत आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर प्रचार, कार्यकर्त्यांची ताकद आणि आर्थिक बळ वापरले जात असल्याने ही लढत अखेरपर्यंत रंगतदार राहील, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या शालिनी वायले यांच्याविरोधात भाजप आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. येथे महिला मतदारांचा कल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार वरुण पाटील हे त्यांच्या विरोधकांशी थेट लढतीत आहेत. दुसरीकडे, काही प्रभागांत भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, मंदा पाटील, महेश पाटील, रंजना पेणकर, सुनीता पाटील, दीपेश जयेश म्हात्रे यांसारख्या उमेदवारांना बिनविरोध विजय मिळाल्याने त्या भागात प्रत्यक्ष मतदानाची लढत उरलेली नाही. एक ते दोन उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये एकीकडे नाराजी, तर दुसरीकडे महायुतीच्या संघटनात्मक ताकदीची चर्चा सुरू आहे.

मनसे आणि ठाकरे गटाने काही प्रभागांत स्थानिक चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः डोंबिवली पश्चिम आणि मध्य भागात मनसेच्या उमेदवारांना तरुण मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे भाजप-शिवसेना महायुतीसमोर सरळ विजय सोपा राहणार नाही, असे संकेत आहेत.

डोंबिवली पश्चिमला पॅनल 25 मध्ये मनसेने धात्रक परिवाराला उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून स्थानिक चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. मात्र भाजपामध्ये गेले अनेक वर्षे राहिलेले धात्रक आणि त्यांचे प्रभागातील काम यामुळे आताच्या भाजपाच्या उमेदवारांना सहज विजय शक्य नाही.

पॅनल 22 मध्ये शिंदे सेनेकडून विकास म्हात्रे, कविता म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाकडून प्रकाश भोईर यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने येथे संदेश व रसिका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. येथे मनसेने वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे प्रकाश भोईर यांना काटे की टक्कर येथे मिळणार आहे. पॅनल 17 मध्ये मोरेश्वर भोईर व कुणाल पाटील धनंजय गायकर आणि प्रज्ञेश पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार तगडी लढत देत आहेत. पॅनल 6 मध्ये शिंदे गटाचे संजय पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर यांच्यात तगडी लढत होणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची ही निवडणूक महायुतीसाठी सत्तेची चाचणी ठरणार आहे, तर विरोधकांसाठी अस्तित्व टिकवण्याची आणि पुन्हा उभारी घेण्याची संधी आहे. काही प्रभागांत निकाल सहज लागणार असला, तरी काही ठिकाणी निकाल शेवटच्या मतापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही केवळ आकड्यांची नव्हे, तर शहराच्या पुढील विकासदिशेचा निर्णय करणारी ठरणार आहे.

प्रमुख लढती

प्रभाग क्रमांक 2 अ: दया गायकवाड, (भाजप) विरुद्ध सुरेंद्र आढाव (काँग्रेस) विरुद्ध लक्ष्मी बोरकर (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 2 ड: गणेश कोट (शिंदे गट) विरुद्ध उल्हास भोईर (मनसे) विरुद्ध अर्जुन म्हात्रे (जय हिंद सेना)

प्रभाग क्रमांक 4 ब: मयूर पाटील (शिंदे गट) विरुद्ध राहुल कोट (ठाकरे गट)

प्रभाग क्रमांक 6 अ: उमेश बोरगावकर (ठाकरे गट) विरुद्ध संजय पाटील (शिंदे गट) विरुद्ध सुधीर वायले (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 6 क: कस्तुरी देसाई (शिंदे गट) विरुद्ध तृप्ती भोईर (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 7 क: हेमा पवार (भाजप), गीतांजली पगार (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 12 ड: सचिन पोटे (शिंदे गट), उदय रसाळ (ठाकरे गट)

प्रभाग क्रमांक 13 ड: महेश गायकवाड (शिंदे गट) विरुद्ध अनंत गायकवाड (मनसे)

प्रभाग क्रमांक २५ अ: मनीषा धात्रक (मनसे) विरुद्ध नंदू म्हात्रे (भाजप)

प्रभाग क्रमांक 29 क: नितीन पाटील (शिंदे गट) विरुद्ध मंदार तावरे (भाजप)