अभिमन्यू इसवरनचे शानदार अर्धशतक आणि आकाश दीप आणि शाहबाज अहमद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर बंगालने बुधवारी मध्य प्रदेशला 193 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले.
विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत मध्य प्रदेशने बंगालला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर इसवरनने 95 चेंडूत 73 धावा करून भक्कम पाया रचला. कुमार कार्तिकेयने त्याच्या डाव्या हाताच्या फिरकीने बंगालला अडचणीत आणले, परंतु त्याला इतर गोलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. कार्तिकेयने 10 षटकांत 34 धावा देऊन चार गाडी बाद केले. बंगालने चांगली फलंदाजी करून 50 षटकांत 254 धावा केल्या आणि एक आव्हानात्मक लक्ष्य मध्य प्रदेशसमोर ठेवला.
त्यांचे पहिले तीन सामने जिंकल्यानंतर, मध्य प्रदेशने एकूण धावसंख्येचा पाठलाग करणे किंवा किमान मजबूत लढत देणे अपेक्षित होते. तथापि, बंगालचे गोलंदाज त्यांच्यावर भारी पडले. आकाश दीपने सहा षटकांत केवळ आठ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेऊन नवीन चेंडूने कमालीचे प्रदर्शन केले. नंतर, शाहबाज अहमदने मध्य प्रदेशच्या फलंदाजीभोवती त्याच्या फिरकीच्या जोरावर जाळे विणले आणि 3.4 षटकात सात धावा देऊन चार गाडी बाद केले.
ठाणेवैभवने सामन्यानंतर आकाश दीप, शाहबाज अहमद आणि बंगालचे प्रशिक्षक लक्ष्मीरतन शुक्ला यांच्याशी संवाद साधला.

त्याच्या कामगिरीवरबद्दल आकाश दीपने सांगितले, “नव्या चेंडूने विकेट्स घेणे हे माझे ध्येय होते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती. मला चेंडूचा टप्पा थोडा वरती ठेवायचा होता आणि एकच टप्पा पकडून सातत्याने गोलंदाजी करायची होती. कोलकत्याच्या परिस्थितीपेक्षा इथली परिस्थिती अगदी वेगळी आहे. येथे खूप गरम आहे त्यामुळे मोठे स्पेल करणे कठीण आहे. असे जरी असले तरी मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेत आहे.”
आकाश दीपने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर त्याच्या बंगालच्या सहकाऱ्यांना भेटायला आलेल्या मोहम्मद शमीने त्याला दिलेली टीपही शेअर केली. तो म्हणाला, “शमी भाई मला नेहमी चेंडूचा टप्पा वरती ठेवायला सांगतात सांगतात, मग तो फॉरमॅट कोणताही असो.”

नंतर प्रशिक्षक लक्ष्मीरतन शुक्ला यांनी त्यांच्या संघाचे कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही आज चांगलं खेळलो. आमच्या शेवटच्या सामन्यात आम्ही सीसीआयमध्ये 84 धावांवर बाद झालो, पण आज आम्ही सुंदर प्रदर्शन केले. आम्ही शिस्तीने फलंदाजी केली आणि आमचे गोलंदाज आज चमकदार होते. आकाश दीप उत्कृष्ट होता. गेल्या वर्षभरापासून तो चांगली कामगिरी करत आहे.”

त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलताना, बंगालचा सर्वात यशस्वी गोलंदाज शाहबाज अहमद म्हणाला, “खेळपट्टी खूप छान होती. मी व्हेरिएशन्स आणि गती परिवर्तनावर भर दिला. तसेच, काही वर्षांपूर्वी मी आयपीएल दरम्यान मुंबईत भरपूर क्रिकेट खेळलो असल्याने मला या परिस्थितीत खेळण्यास सोयीस्कर वाटले.”
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पुढील सामना 1 डिसेंबरला गोवा आणि नागालँड यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी पहिले तीन सामने गमावले आहेत. राहुल त्रिपाठी, सुयश प्रभुदेसाई आणि अर्जुन तेंडुलकर ही काही मोठी नावे या सामन्यात दिसणार आहेत. सामना सकाळी 9 वाजता सुरु होईल.