बारवी धरण ९० टक्क्यांवर!

नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पडणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण ९० टक्क्यांच्या वर भरले आहे. धरण पूर्ण भरण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अखत्यारीत असलेले बारवी धरणाची पाण्याची पातळी आज दुपारी ७१.६४ मीटरवर पोहोचली आहे. धरण ७२.६० मीटरला ओव्हर फ्लो होते. धरणात ९०.९९टक्के जलसाठा झाला आहे. पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढू शकतो, त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढून धरणाचे स्वयंचलित दरवाजे वक्राकार पद्धतीने उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता उमेश देशमुख यांनी आज 3 ऑगस्ट रोजी कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड तहसीलदारांना धरणातील पाण्याच्या होणाऱ्या विसर्गाबाबत माहिती दिली आहे.

धरणातून पाणी विसर्ग झाल्यानंतर बारवी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊ शकते, त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी आसनोली, चांदप, चांदप पाडा, पिंपळोली, सागाव, पादिरपाडा, राहटोली आदी नदीकिनारी असणाऱ्या गावे पाडे यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.