जिम्नॅस्टिक्समध्ये ठाण्याच्या आर्यन दवंडेची सोनेरी हॅट्ट्रिक; सलग तीन खेलो इंडिया स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक

चेन्नई : ठाण्याचा खेळाडू आर्यन दवंडे याने अपेक्षेप्रमाणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स या प्रकारात सोनेरी हॅट्ट्रिक साजरी केली. गेल्या दोन स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूने यंदा वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकले.

आर्यन याच्यापुढे प्रणव मिश्रा (उत्तर प्रदेश) व डी. हर्षित (उत्तर प्रदेश) यांचे आव्हान होते. आर्यन याने ७३.२०० गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. प्रणवला ७२.४७० गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर हर्षितने ७१.७०० गुणांसह कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या सार्थक राऊळ याला सातवे स्थान मिळाले. त्याने ६९.५६६ गुणांची नोंद केली.

आर्यन व सार्थक हे दोन्ही खेळाडू ठाणे येथे महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. आर्यन हा वैयक्तिक साधन प्रकारांमध्येही सहभागी झाला असून तेथेही त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे.

आर्यन या अठरा वर्षीय खेळाडूने कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला आहे. त्याने कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तसेच जागतिक शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फ्लोअर एक्झरसाईज, समांतर बार, डबल बार इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये त्याची हुकूमत असून आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्याने भरघोस पदकांची कमाई केली आहे. तो मुलुंड येथील वझे महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकत आहे.

आर्यन याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. घरात कोणतीही खेळाची पार्श्वभूमी नसताना त्याने जिम्नॅस्टिक सारख्या आव्हानात्मक खेळात चमकदार कारकीर्द घडवली आहे. ज्युनिअर के. जी. पासून तो बाभुळकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्याकडील जिम्नॅस्टिक्सकरिता असलेली क्षमता, इच्छाशक्ती व आत्मविश्वास पाहून बाभुळकर यांनी त्याला याच खेळामध्ये स्पर्धात्मक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्याने महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे.

स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राच्या मुली उपांत्य फेरीत

स्क्वॉश या क्रीडा प्रकारात मुलीच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यामध्ये कर्नाटक संघाचा २-० पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. निरुपमा दुबे, आनिका दुबे, रीवा निंबाळकर, अलिना शहा यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करताना महाराष्ट्राला उपांत्य फेरी प्रवेश मिळवून दिला. महाराष्ट्राचा उपांत्य फेरीचा सामना उत्तर प्रदेश संघाबरोबर उद्या होणार आहे.