आषाढीनिमित्त शिवमंदिर परिसरात रिंगण

भाविकांची अलोट गर्दी

अंबरनाथ : आषाढी एकादशीला अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर परिसर रामकृष्ण हरी आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमला.

एकादशीच्या निमित्ताने उल्हासनगर कॅम्प पाचमधील विठ्ठल मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दिंडी यात्रा निघाली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषात पारंपारिक वारकरी पोशाखातील महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी दिंडीत सहभाग घेतला. उल्हासनगर शहरात जेवण डबे वाहतूक करणाऱ्या बांधवांनी पंढरपूरला प्रत्यक्ष न जाता अंबरनाथच्या शिवमंदिरात वारीचा आनंदोत्सव उल्हासनगरात अनुभवण्यासाठी काही वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे. गायकवाड पाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातुन निघालेली दिंडी प्राचीन शिवमंदिरात दाखल झाली. यावेळी शिवमंदिरात गोल रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.