दोन नव्या स्थानकांना मंजुरी; १० लोकल सेवांची होणार वाढ

नवी मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी

नवी मुंबई: नेरूळ-उरण आणि बेलापूर-उरण या उपनगरीय रेल्वे मार्गांवर लोकल फेऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून नवी मुंबईकरांचा प्रवास खूप सोयीस्कर होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीवर केंद्र सरकारने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अतिरिक्त सेवांना मंजुरी दिल्याचे कळवले आहे.

या मंजुरीनुसार नेरूळ-उरण मार्गावर चार अतिरिक्त फेऱ्या तर बेलापूर-उरण मार्गावर सहा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नव्या सेवांमध्ये तरघर आणि गव्हाण स्थानकांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना प्रथमच नियमित आणि अधिक सोयीस्कर रेल्वे सुविधा मिळणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की उरण परिसरातील हजारो चाकरमानी दररोज नवी मुंबई, पनवेल आणि मुंबईकडे नोकरीसाठी प्रवास करतात. विद्यार्थ्यांचीही मोठी संख्या या मार्गावरून कॉलेज आणि शाळांसाठी ये-जा करते. कमी फेऱ्यांमुळे प्रवाशांना आतापर्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू झाल्यानंतर गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुटसुटीत, वेळेवर आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः उरण परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नवी मुंबईसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, हा मार्ग उपनगरीय वाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम आणि सक्षम होणार आहे. नव्या फेऱ्या सुरू होण्याची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा असून स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

रेल्वे मार्गावरील स्थानकांची यादी
नेरुळ जंक्शन (हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांसह इंटरचेंज), सीवूड्स-दारावे (ट्रान्स-हार्बर मार्गासह इंटरचेंज), सीबीडी बेलापूर जंक्शन (हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि नवी-मुंबई मेट्रो मार्गांसह इंटरचेंज), तरघर (नवीन स्टेशन, लवकरच कार्यान्वित होणार), बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण (नवीन स्टेशन, लवकरच कार्यान्वित होणार),शेमतिखर, न्हावा शेवा, द्रोणागिरी, उरण.