मुंबई: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आनंद परांजपे यांनी गेल्या काही दिवसांत दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. परांजपे यांना महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आनंद परांजपे यांनी 2012 मध्ये शिवसेनेला राम राम करताना एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढवून घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही नाराजी दूर केली. त्यामुळेच त्यांच्या पक्ष प्रवेशाला शिंदेंनी हिरवा कंदील दाखवला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर, आज खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला.
आनंद परांजपे हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती, विशेष म्हणजे त्यांनी गेल्या काही दिवसांत दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण कुठल्या पक्षात जाणार याबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. मात्र, त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, बोलताना आपली राष्ट्रवादीत कुठलीही नाराजी नसल्याचेही स्पष्ट केले. माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, कुठल्या अपेक्षेने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले नाही. संघटनेने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत, त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेते व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत, असे आनंद परांजपे यांनी म्हटले.
कुठल्याही पदाच्या अपेक्षेने मी शिवसेनेत प्रवेश केला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम, आणि माझा डीएनए हा शिवसेनेचाच आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करेन. पक्षसंघटनेत मला काम करायचे आहे, पक्षसंघटनेत मला जे काम दिले जाईल ते मी जोमाने पार पाडेन, आज मी स्वगृही आलोय, असे आनंद परांजपे यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, प्रभू श्रीरामांनीही 14 वर्षे वनवास भोगला होता, मी 12 वर्षे वनवासात होतो, वनवास चांगलाच असतो, तो संपत आला आहे, असेही परांजपे यांनी म्हटले.