भिवंडीत वाहन तपासणीत चार लाखाची रक्कम जप्त

भिवंडी: महानगर पालिकेच्या निवडणूक आदर्श आचारसंहिता भरारी पथकाने कल्याण रोडवरील साईबाबा चेकपोस्ट येथे वाहन तपासणी मोहीमेत एका वाहनातून सुमारे चार लाख ४० हजार रुपयांची रोकड रक्कम जप्त केली आहे.

शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ती भंग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. शहरातील विविध ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची पोलीस व आचारसंहिता पथकाचे अधिकारी तपासणी करत आहेत. दरम्यान साईबाबा चेकपोस्ट येथे काल सायंकाळी आचारसंहिता पथकाचे भरारी पथक क्रमांक एकचे अधिकारी दीपक नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन तपासणी दरम्यान चारचाकी वाहन मारुती इर्टीगा (क्रमांक MH-05-EV-666) या वाहनातून चार लाख 40 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली.

वाहन चालक नरेंद्रसिंग देवरे यांच्याकडे ही रक्कम कुठून आली आणि ही रक्कम कुठे नेण्यात येत होती, याबाबतची चौकशी करण्यात आली. संबंधित कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालक कोणत्याही प्रकारची कागदपत्रे एफएसटी पथकास दाखवू शकले नाहीत. त्यामुळे पथक प्रमुखांनी ही रक्कम पंचनामा करून ताब्यात घेतली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे नोंद करून सदरची रक्कम महापालिकेच्या लेखा विभागात जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.