शेवटच्या दिवशी २६९ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ जानेवारी या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २६९ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकाच्या मैदानात ४९९ उमेदवार शिल्लक राहिले असून त्यांचे भवितव्य १५ जानेवारीला मतपेटीत बंद होणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसहित अपक्ष उमेदवारांनी देखिल दंड थोपटले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबरला नवी मुंबईत घडलेल्या अनेक घडामोडीनंतर तब्बल ९५६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर ३१ जानेवारीला अर्ज छाननी दिवशी तांत्रिक बाबीमुळे तब्बल ११७ अर्ज बाद करण्यात आले होते तर ८३९ अर्ज वैध ठरण्यात आले होते. २ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. दुपारी तीन वाजेपर्यंत ८३९ पैकी २६९ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे मनपा निवडणुकीत आता प्रत्यक्ष ४९९ उमेदवार मैदानात उरले आहेत.
उद्या ३ जानेवारी रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. १३ जानेवारीला सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला अवघे दहा दिवस मिळणार असल्याने आपल्या विजयासाठी उमेदवारांना ऐन थंडीत घाम गाळावा लागणार आहे.