डोंबिवली: डोंबिवली जवळील गोळवली गावात चिंधी बाजार परिसरातील कष्टकरी कुटुंबातील एक मुलगा पाच दिवसापूर्वी दुपारी खासगी शिकवणीला जातो सांगून घरातून बाहेर पडला मात्र नियोजित वेळेत तो घरी आला नाही.
खासगी शिकवणी चालकाने मुलगा शिकवणीला आला नसल्याचे कुटुंबियांना सांगितले. कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेतला, पण तो आढळून आला नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने त्याला फूस लावून पळून नेले असण्याचा संशय घेत कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दावडी गावातील एका शाळेत हा पंधरा वर्षाचा विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. या मुलाचे आई, वडील गोळवली, दावडी परिसरात मजुरीवर काम करतात. त्यांची मुले परिसरातील शाळेत शिक्षण घेतात. बेपत्ता झालेला दहावीचा विद्यार्थी शाळा सुटल्यानंंतर संध्याकाळी साडे पाच वाजता खासगी शिकवणीला जातो आणि रात्री साडे आठ वाजता घरी येतो..
कुटुंबीयांनी गोळवली, दावडी परिसरात फिरून मुलाचा शोध घेतला मात्र तो आढळला नाही. त्याच्या मित्र, मैत्रिणी, वर्गातील इतर सहकाऱ्यांच्या घरी जाऊन तसेच अन्यत्र मुलाबाबत चौकशी केली, पण काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.