आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे : पावसाळ्यात मेट्रोच्या परिसरात पाणी साठण्याची फार मोठी शक्यता आहे. ही परिस्थिती उदभवू नये व आवश्यक पावले आताच उचलली जावीत यासाठी मेट्रो प्रशासनासोबत विस्तृतपणे संपूर्ण मेट्रोच्या लांबीमधील प्रत्येक स्थळनिहाय सध्याच्या परिस्थितीची सद्यस्थिती याबाबतचा आढावा आज आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात महापालिका व मेट्रो प्राधिकरणामार्फत विविध कामे सुरू असून ही कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करावीत. पावसाळयात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीस या यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावीत, पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पाणी साचणार नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सद्धस्थितीतील कामे ही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व यंत्रणांना दिले.

ठाण्यात मॉडेला ते तीन हात नाका, नितिन कंपनी जंक्शन- कॅडबरी-माजिवडा-कापूरबावडी- मुल्ला बाग-कासारवडवली-वाघबीळ जंक्शन ते पंचामृत सोसायटी अशा विविध टप्प्यात मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर काही ठिकाणी माती पडलेली आहे, काही ठिकाणी काम सुरू नाही पण बॅरीकेटस् लावलेले आहेत, ते बॅरीकेटस् काढून घ्यावेत जेणेकरुन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होण्यास मदत होईल. तसेच ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत व ज्या ठिकाणी खड्डा खणला आहे, तेथे बॅरीगेटस् लावावेत. ड्रेनेज लाईन नाल्याला जोडलेल्या आहेत का याची प्रत्यक्ष जागेवर जावुन पाहणी करणे, नसल्यास तातडीने ती कामे करुन घेणे, तसेच काही ठिकाणी गटाराची कामे अर्धवट अवस्थेत आहेत ती कामे येत्या चार दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

गेल्यावर्षी पावसाळ्यात आर- मॉल, मानपाडा, वाघबीळ या परिसरात मोठा पाऊस झाल्यावर पाणी साचले होते, यंदा त्या ठिकाणी पाणी साचणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. डोंगरभागातून येणारे पाणी हे थेट रस्त्यावर येते त्यासाठी पावसाळ्यात पंप उपलब्ध करुन पाण्याचा निचरा होईल हे पहावे. पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सूचित केले. पावसाळा अजून सुरू झालेला नसल्यामुळे सर्व यंत्रणांना सुरू असलेली उर्वरित कामे करण्यासाठी वेळ आहे. या कालावधीचा फायदा घेवून कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

पावसाळ्यात परिस्थिती कशी असेल हे आता आपण कोणीही सांगू शकणार नाही, त्यामुळे परिस्थितीनुरूप काम करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.