ठाणे: बेंगळुरू येथे ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीचा स्टार खेळाडू अमन फारोग संजय याने मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक पटकावले. या यशामुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या नावे आणखी एक राष्ट्रीय दर्जाचे दुहेरी पदक जमा झाले आहे.
या स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडू खेळत होते. अमनने वैष्णवी खडकेकर हिच्यासोबत मिश्र दुहेरीत जोडी जमवत अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळ सादर केला. संपूर्ण स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत अपराजित वाटचाल करत अमनने अनुभवी खेळाडूंमध्ये आपली वेगळी छाप पाडली.
राउंड ऑफ ३२ मध्ये अमन-वैष्णवी जोडीने कर्नाटकच्या ब्योर्न जेसन आणि केरळच्या दिया बी. या जोडीचा १२-२१, २१-१६, २१-१४ अशा चुरशीच्या तीन सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली.
राउंड ऑफ १६ मध्ये ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीच्याच प्रतिक राणे-तारिणी सूरी या जोडीविरुद्ध खेळताना अमन-वैष्णवी जोडीने सहज आणि नियंत्रित खेळ करत २१-१६, २१-१० असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.
उपांत्यपूर्व फेरीत अमनने आणखी एक प्रभावी कामगिरी करत तमिळनाडूच्या रोहित एम.-रिदुवर्षिणी आर. या जोडीवर २१-१३, २१-११ असा दमदार विजय नोंदवून पदक निश्चित केले. उपांत्य फेरीत अत्यंत चुरशीच्या लढतीत अमन-वैष्णवी जोडीला पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांच्या या लढाऊ खेळाने त्यांनी स्पर्धेत कांस्य पदकावर आपली मोहोर उमटवली.
देशातील सर्वोत्तम खेळाडूंच्या उपस्थितीत, सीनियर गटात मिळवलेले हे पदक ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीतील शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि उच्चस्तरीय स्पर्धात्मक तयारीचे फलित असल्याचे अधोरेखित करते. विशेषतः दुहेरी प्रकारात ठाणे अकॅडमीचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सातत्याने पदके मिळवत असल्याचे हे आणखी एक ठोस उदाहरण ठरले आहे.
या संपूर्ण प्रशिक्षण व्यवस्थेबाबत प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, शिस्तबद्ध सराव, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मानसिक तयारीमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू आज जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर सातत्याने दमदार कामगिरी करत असून, हीच वाटचाल भविष्यात अधिक मोठ्या यशाकडे नेणारी ठरेल.
या राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीमागे ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील अनुभवी व समर्पित प्रशिक्षक संघाचे मोलाचे योगदान असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अकॅडमीमध्ये प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता आणि मानसिक मजबुती विकसित केली जात आहे.