ठाणे, नवी मुंबईकरांसाठी ‘चलो अ‍ॅप’तर्फे एअरपोर्ट एक्सप्रेस सेवा

ठाणे : ‘बेस्ट’उपक्रमाच्या ‘चलो अ‍ॅप’तर्फे ठाणेकरांसाठी तसेच नवी मुंबई ते मुंबई एअरपोर्ट विमानतळापर्यंत एक्सप्रेसची सेवा सुरु झाली आहे. ‘चलो अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रवासी तिकीटे खरेदी करू शकतात, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या अधिका-यांनी दिली.

एकाही प्रवाशाला उभा राहून या बसमधून प्रवास करता येणार नाही. या बसमधून प्रवासासाठी ‘चलो अ‍ॅप’द्वारे तिकीट आरक्षित करावे लागणार आहे. त्यानंतर आसन क्रमांक मिळाल्यानंतरच प्रवास करता येणार आहे, असे बेस्ट उपक्रमातील सूत्रांनी सांगितले. सोमवार ते रविवार ‘एअरपोर्ट एक्सप्रेस’ सेवेची पहिली बस विमानतळावरून सकाळी सहा तीस वाजता तर शेवटची बस रात्री अकरा वाजता सुटेल. दर 30 मिनिटांनी बस प्रत्येक मार्गिकांवर धावणार आहेत.

शहरांपासून विमानतळापर्यंत दर अर्ध्या तासांनी बससेवा ‘बेस्ट’च्या ‘चलो अ‍ॅप’तर्फे एअरपोर्ट एक्सप्रेस सेवा सुरु झाली आहे. ठाणे शहर, नवी मुंबई ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळ या मार्गावर सध्या धावणा-या बेस्टच्या बसेस्ना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही सेवा वाढवण्यात आली असून 45 बसगाड्या चार मार्गांवर दर 30 मिनिटांनी धावू लागल्या आहेत. परिणामी विमानतळापर्यंतचा प्रवास आरामदायी व सुखकर होत आहे, असा दावा ‘चलो अ‍ॅप’नी केला.

गेल्या सहा महिन्यांपासून चार वेगवेगळ्या मार्गिकांवर मुंबईतील उपनगरे ते विमानतळ या मार्गावर प्रीमियम बससेवेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. एक ते दोन तासांनी प्रवासी संख्येची नोंदणी करण्यात आली. हा प्रवास महागडा असला तरी ‘प्रवासी’ यांचा प्रतिसाद जास्त असल्यामुळे ‘चलो अ‍ॅप’या उपक्रमातून वेगवेगळ्या मार्गिकांंवर एअरपोर्ट एक्सप्रेस सेवा ही बस सेवा सुरू झाली आहे.

एअरपोर्ट एक्सप्रेस सेवेच्या सेवेअंतर्गत उपनगर ते विमानतळ आणि तेथून परत दररोज 230 बस फे-या चालविल्या जाणार आहेत. मार्च 2024 पर्यंत 50 टक्के बसगाड्या विजेवर धावणार आहेत. लवकरच 100% बसगाड्या विजेवर धावतील असे नियोजन करण्यात आले आहे.