* चार आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
* १२जण सोबत असल्याचा दावा
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता आमदार देखील फुटणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. ठाकरेंच्या चार आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या चार आमदारांनी १२ आमदार सोबत असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदेंना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. ही भेट अलीकडच्या काळात झाल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर संपवल्यानंतर टायगर 3.0 सक्रिय झाल्याचे सांगण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चार आमदारांनी दोन-तीन दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे. त्या आमदारांनी 12 आमदार सोबत असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 असून त्यापैकी दोन तृतियांश आमदारांची संख्या 14-15 इतकी होते. त्यामुळं आगामी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आमदारांनी शिंदेंकडून मागून घेतल्याची माहिती आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यात चौदा ते पंधरा आमदारांचा एक गट स्थापन करुन मग हे सगळे जण ठाकरेंपासून वेगळे होतील. त्यानंतर ऑपरेशन टायगर 3.0 पूर्ण होईल, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदेंना ठाकरेंचे चार आमदार भेटले होते, त्यांनी 12 आमदार सोबत असल्याची माहिती दिली आहे. खासदारांच्या पक्षांतरामुळं निर्माण झालेला रोष वाढू नये यामुळं आमदारांचं ऑपरेशन येत्या दोन ते तीन महिन्यात राबवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना कोणते आमदार भेटले याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. खासदार फुटल्यानंतर आमदार फुटल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसू शकतो.
जे काय घडणार आहे, ते तुमच्या समोर येईल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भूमिकांना कंटाळून बाहेर पडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी कार्यकर्ते जोडले जात आहेत. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची काम होत आहेत. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख वाटत नाहीत, इतर माणसं तेच पक्षप्रमुख आहेत, अशा आवेगात आहेत. या गोष्टींना आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते वैतागले आहेत आणि त्यामुळे ते साथ सोडत आहेत, असे नरेश म्हस्के म्हणाले.