अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांचा कारावास

ठाणे: अल्पवीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमला ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही व्ही विरकर यांनी तीस हजार रुपये दंड आणि दोन गुन्ह्यात प्रत्येकी २० वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

भिवंडी तालुक्यातील बापगांव परिसरात राहणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे बब्बू उर्फ मोहंमद इस्लाम गुलाम इंदरसी असे नाव आहे. तो त्याच परिसरात राहत होता. पीडित मुलगी ही आईला किराणा मालाच्या दुकानात मदत करत होती. २०१८ साली आरोपी दुकानात येत असल्याने मुलीची त्याच्याबरोबर ओळख झाली होती. त्याने तिला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून त्या परिसरातील जंगलात लैंगिक अत्याचार केले होते. तिच्या आईला चार महिन्यानंतर मुलगी गरोदर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिने पडघा पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पोक्सो न्यायालयाचे विशेष) व्ही. व्ही. विरकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. पोस्को न्यायालयाच्या विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडून साक्षीदार न्यायालयात सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री. विरकर यांनी आरोपीला दोन गुन्ह्यात प्रत्येकी 20 वर्षांची आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा त्याला एकत्रित भोगायच्या असून ३० हजार रुपये दांडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड भरला नाही तर १०० दिवसांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. या गुन्ह्याचा तपास पडघा पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी केला होता.