अंबरनाथला घरपट्टी थकबाकीदार नागरिकांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यावर्षी जानेवारीपासून लागू होणाऱ्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना मूळ एक रकमी कर रक्कम भरण्यावर शास्तीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांनी केले आहे. अभय योजना ३१ मार्च, २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित करदात्यांनी नगरपरिषदेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधावा. अथवा नगरपरिषदेच्या https://mahaulb.in/PortalSite/#/app/home या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन थकबाकी रक्कम जमा करावी. या अभय योजनेमुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होऊन, कर वसुलीला प्रोत्साहन मिळून नगरपरिषदेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

शहरातील सर्व थकबाकीदार नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा व आपली थकबाकी ३१ मार्च, २०२६ पर्यंत भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.