उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
ठाणे: ठाण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे अनेक प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यामध्ये मेट्रो ४ व ४ अ ची चाचणी यशस्वी झाली असल्याने या सेवेचे स्वप्न साकार होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मेट्रो ५ व १२ मुळे ठाणे-कल्याण-नवी मुंबई एकत्रित जोडणी, ईस्टर्न फ्री-वे विस्तार, ठाणे कोस्टल रोड, बोगदा प्रकल्प गतिमान, कोपरी ते पटणी पुल, पटणी-नवी मुंबई एअरपोर्ट एलीव्हेटेड कॉरिडॉर, अवजड वाहनांना शहराबाहेरील मार्ग तयार करुन देण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटून ठाणे वेगवान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली. जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे प्राधान्य आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली. डोअर स्टेप डिलिव्हरीद्वारे ४३१ ग्रामपंचायतीतील पाच हजार नागरिकांना घरबसल्या सेवा, दिवंगत कर्मचार्यांच्या ४३ वारसांना तत्काळ नियुक्ती, ठाणे जिल्हा मोबाईल मेडिकल युनिटमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
मनाचे आरोग्य जपण्यासाठी आपण ‘मायका’ हे मराठीतील पहिले मानसिक आरोग्य अॅप आणले आहे. २१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३१ शाळा आम्ही ‘स्मार्ट’ केल्या आहेत. कल्याणमधील ३० शाळांमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ द्वारे चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. नदीतल्या जलपर्णीपासून शोभेच्या वस्तू बनवून महिलांनी ‘कचर्यातून सोनं निर्माण केल आहे. जवळपास १२ हजार कातकरी कुटुंबांना घरकुल मंजुरी, मेट्रो, रस्ते आणि कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय सुरु झाला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सकल्पनेतून साकारलेल्या ई-संजीवनी या ब्लॉकचेन आधारित सुरक्षित डिजिटल प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमध्ये जातप्रामणपत्र, वंशावळ, जमीनीचे वारस शोधणे यासारख्या बाबींची माहिती ऑनलाईन पध्दतीने आणि जलद गतीने प्रप्त करण्यास मदत होणार आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे-डमाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांमार्फत शानदार संचलनही करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने ठाणे जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या उत्कृष्ट कार्याच्या योगदानाबाबत क्रीडापुरस्कार २०२३-२०२४ प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा तसेच आपत्ती परिस्थितीत योगदान देणार्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. डी.स्वामी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.