दिव्यात अतिक्रमणविरोधी पथकावर महिलेने टाकले पेट्रोल

* पोलिसांकडून सौम्य लाठीमार
* दोन इमारती केल्या खाली

ठाणे: दिवाळीच्या सुट्टीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दिव्यात कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर रॉकेल टाकले. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिव्यातील शीळ परिसरात यापूर्वीच पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. यापूर्वी काही इमारतींवर कारवाई करून या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मात्र दिवाळीचा सण आल्याने दिव्यातील या कारवाईला ब्रेक लागला होता. उर्वरित इमारतींवर आज पुन्हा एकदा पालिकेच्या अतिक्रण विभाग कारवाई करणार असल्याचे वृत्त ‘ठाणेवैभव’ने दिले होते. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारत सोमवारी पहिल्याच दिवशी उर्वरित सात इमारतींवर कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पालिकेचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात गेले. रहिवाशांनी ज्या व्याप्त इमारती आहेत अशा इमारतींमधून रहिवाशांना घरे खाली करण्याचे मोठे आव्हान पालिकेचे पथक आणि पोलिसांच्या समोर होते.

कारवाई करण्यासाठी पालिकेच्या पथकाने इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केल्यावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहिवासी जमा झाले. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलिसांवर आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर चक्क रॉकेल टाकले. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला.

नागरिकांचा विरोध रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार देखिल केला होता, त्यामुळे महापालिका पथकाला इमारत खाली करून काही प्रमाणात कारवाई करण्यात यश आले. एकूण अनधिकृत इमारतींपैकी सात इमारतींवर कारवाई करण्यासाठी सोमवारी पालिकेचे पथक दिव्यात गेले होते. मात्र केवळ दोन इमारती रिकाम्या करण्यात पालिकेच्या अतिक्रमण पथकाला यश आले. तर सोमवारी एकाही इमारतीवर पालिकेला हातोडा चालवता आलेला नाही.

शीळ परिसरातील २१ अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने कारवाई केली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शीळ भागात झालेल्या या अनधिकृत इमारतींच्या संदर्भात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या .त्यानंतर उर्वरित इमारतींवर पालिकेने आता कारवाईला सुरुवात केली आहे. या इमारतीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ३१ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थित सर्व परिमंडळातील अधिकारी कर्मचारी या कारवाई करिता नियुक्त करण्यात आले होते परंतु नागरिकांच्या रोषामुळे महापालिकेला म्हणावी तशी कारवाई करण्यात यश आले नाही अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती