सागर शिंदे यांच्या वीरमरणाने वाफेवरच्या अग्निशमन बंबाचे मॉडेल पोरके
ठाणे: कवी, कलाकार, विशेष प्रशिक्षित असे सर्वगुणसंपन्न सागर शिंदे यांना तीन महिन्यांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झाले होते. अभ्यासातून वाफेवर धावणाऱ्या अग्निशमन बंबाचे मॉडेलही त्यांनी तयार केले होते. ते निष्पाप बाळ आता पितृ प्रेमाला वंचित झाले आहे तर कार्यालयात सजवून ठेवलेले ते मॉडेलही मालकाच्या निधनाने खऱ्या अर्थाने निष्प्राण झाले आहे.
गावदेवी भाजी मंडईत झालेल्या अग्नितांडवात अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे यांना वीरमरण आले आणि अग्निशमन दलालाच हुंदका फुटला. कितीही रागात आलेला माणूस वीरमरण आलेल्या सागर शिंदे यांच्या मनमिळाऊ स्वभावासमोर काही मिनिटांतच शांत होत असे. त्यांच्यासारखा हुशार स्थानक अधिकारी पुन्हा ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात होणार नसल्याची भावना अग्निशमन दलातील जवानांनी व्यक्त केली आहे.
गावदेवी भाजी मंडई येथील भीषण अग्निकांडात सुरक्षा रक्षकाला वाचवताना स्थानक अधिकारी सागर शिंदे यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन महिन्यांची मुलगी, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
सागर शिंदे यांनी फायर फायटिंगचे शिक्षण युकेमधून घेतले होते. अतिशय हुशार अधिकारी म्हणून त्यांची गणना होत होती. ते कवी देखील होते. विविध विषयांवर त्यांनी कविता केल्या होत्या. त्यांनी वाफेवर चालणाऱ्या अग्निशमन बंबाचे मॉडेल तयार केले होते. त्याची प्रतिकृती अग्निशमन दलाच्या नितिन कंपनी येथिल मुख्य कार्यालयात ठेवण्यात आली आहे. अतिशय कलाकुसरीने हे यंत्र त्यांनी तयार केले होते. हे मॉडेल पाहताना कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आजही हुंदके देताना दिसत होते. अशा या हुशार अधिकाऱ्याला ठाणे महापालिका मुकल्याची भावना व्यक्त केली जात होती.
गणेशोत्सवामध्ये त्यांच्या घरी गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी वेग वेगळ्या सामाजिक विषयांची आरास तयार करून गणेश भक्ताची मने जिंकली होती.
ही दुर्घटना घडली त्या दिवशी सागर शिंदे यांची साप्ताहिक सुट्टी होती. परंतु गंभीर दुर्घटना घडल्याने त्यांनी संदेश मिळताच कर्तव्यावर हजर झाले होते. आपला एक सहकारी पहिल्या मजल्यावरून खाली आला नसल्याने त्यांनी सुरक्षा रक्षक आणि सहकाऱ्याचा शोध घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेले. मात्र गडद धुरात गुदमरून त्यांना वीरमरण आले.