प्रश्नांची उत्तरे न सांगितल्याने विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला

भिवंडी: शहरातील शांतीनगर हद्दीतील शाळेत दहावीची परीक्षा सुरु असताना पेपरात प्रश्नांची उत्तरे न सांगितल्याने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल मंगळवार २६ मार्च रोजी शांतीनगर येथील साफिया हायस्कुलमध्ये दहावीच्या परीक्षा सुरु होती. त्यावेळी एका वर्गात परीक्षेचे पेपर लिहीत असलेल्या विद्यार्थ्याकडे वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे मागितली. त्यावेळी त्याने उत्तरे न सांगितल्याने त्यास शाळेबाहेर वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी गाठले आणि तिघांनी आपसात संगनमताने त्यास ठोश्याबुक्क्यांने मारहाण करीत चाकूहल्ला करून त्यास जखमी केले आहे. या झटापटीत जखमी विद्यार्थ्याचा मोबाईलही गहाळ झाला आहे.

या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात जखमी विद्यार्थ्याने फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून परीक्षेला बसण्यापूर्वी मुलांची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.