ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल जवानांचे धाडस
ठाणे: शास्त्रीनगर नाक्याजवळील मिलन हिल या १८ मजली इमारतीच्या १० व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे इमारतीत दाट धूर पसरला. या इमारतीत ६० ते ७० रहिवासी अडकले, मात्र याच क्षणी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दल देवदूतासारखे धावून आले आणि मोठी दुर्घटना टळली. दरम्यान जखमी दोन ज्येष्ठ रहिवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.
पहाटे सुमारे ४.१४ वाजता घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी युटिलिटी वाहनासह तर अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान फायर व रेस्क्यू वाहनांसह काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे १० ते १३ मजल्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि इमारतीतील ६० ते ७० रहिवासी जीव मुठीत धरून अडकून पडले होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत, शिड्या, संरक्षक उपकरणे व श्वसन यंत्रांच्या मदतीने रहिवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. याचवेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण इमारतीत समन्वय राखत घबराट पसरू न देता मदतकार्य प्रभावीपणे राबवले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, अग्निशमन केंद्राचे उपस्थानक अग्निशमन प्रशांत मुल्ल्या हजर होते.
१० व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये अडकलेल्या सात रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. काही घरांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली, हेच या मोहिमेचे सर्वात मोठे यश ठरले. रुचिरा देशमुख (७४) आणि विवेक प्रधान (६२) हे भाजल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी बेथनी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
सकाळी सुमारे ५.३० वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. संपूर्ण कारवाईदरम्यान ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.