ठाणे : शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या वादानंतर आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली. आता विरोधी पक्षनेते पदावर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांत दावे करण्यात येत आहेत. दरम्यान शरद पवार गटाचे जास्त उमेदवार असल्याने हे पद याच गटाच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.
एमआयएमच्या पाठींब्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात २८ जानेवारीलाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट नजिब मुल्ला यांनी केला आहे. आता पक्षाच्या मुख्य नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
गेल्या निवडणुकीत ३४ नगरसेवक निवडून आणणार्या आव्हाडांना यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या १२ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. शहरासह मुंब्य्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र गुरू-शिष्याच्या या लढाईमध्ये मुंब्र्यात एमआयएमने मुसंडी मारत आपले पाच नगरसेवक महापालिकेत पाठवले आहेत. महापालिकेत महायुतीचे महापौर, उपमहापौर बसतील हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट झाले. पण प्रबळ विरोधी पक्षासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे ठाण्यातही हे मनोमिलन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अधिक सुकर होणार होता. विरोधी पक्ष आणि स्थायी समिती ही दोन्ही पदे वाटून सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्यात येणार होता. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर या विलीनीकरणावरून सध्या राजकारण तापले आहे. याची झळ ठाण्यातही पोहचेल असे वाटत होते. पण पवार यांच्या अस्थिदर्शनाला आलेल्या गुरु-शिष्याने एकमेकांना गळाभेट दिल्याने मनोमिलनाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. असे असले तरी किमान विरोधी पक्ष नेतेपद हाती रहावे यासाठी दोन्ही कडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे १२ नगरसेवक आणि ठाकरे गटाचा एक असे १३ नगरसेवक असून ही संख्या विरोधी पक्षनेते पदापासून स्थायी समिती सदस्य, स्विकृत नगरसेवक बनवण्यासाठी पुरेशी आहे. शरद पवार गट पालिकेतील तिसरा मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आली तर ताकद वाढेल, असे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले. मात्र यासंदर्भातील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचेही ते म्हणाले.