सुदैवाने जीवितहानी नाही
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क प्रभागक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या टिळक चौक परिसरातील हंसराज चाळीचा भाग शुक्रवारी रात्री कोसळला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कल्याण पश्चिमेतील टिळकचौक परिसरातील हंसराज ग्राऊन्ड प्लस वन चाळीचा एक भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या चाळीत एक भाडेकरू राहत असून ८० वर्षे जुनी चाळ असल्याचे मालक परेश पंचपत्या यांचे म्हणणे आहे. तर राहत असलेला भाडेकरू जायला तयार नसून चाळीच्या दुरावस्था, वस्तुस्थिती संदर्भात प्रशासनाला वारंवार कळवून देखील दखल घेतली जात नाही, कारवाई करत नाही. जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहिल असे परेश यांनी प्रसिद्धी माध्यामांना सांगितले.
हंसराज चाळीचा एक भाग कोसळल्याबाबत क प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता आपत्कालीन कक्षाकडून माहिती घेतो, कर्मचारी पाठवतो, कळवितो असे उत्तर दिले.