ज्येष्ठ वैज्ञानिक काकोडकर आणि आयुक्तांची चर्चा
ठाणे: ठाणे शहरात विज्ञान केंद्र उभारण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या असून राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्याबाबत सविस्तर चर्चा केली.
तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्याबाबत चर्चा झाली होती, परंतु त्यांची बदली झाल्यानंतर विज्ञान केंद्र बासनात गुंडाळून ठेवण्यात आले होते. मागील मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विज्ञान केंद्र उभाण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ठाण्यात केंद्र उभारण्याबाबत चर्चा झाली असल्याची आठवण ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी करून दिली होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्री. बांगर यांना केंद्राबाबत सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज आयुक्त श्री. बांगर यांच्या दालनात चर्चा झाली. हे केंद्र कसे असावे, त्याला किती भूखंड आवश्यक आहे, कोणकोणत्या सुविधा निर्माण कराव्यात, ठाण्यातील विद्यार्थ्यांना तसेच विज्ञान प्रेमींना त्याचा कसा लाभ घेता येईल, याबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते.
महापालिका आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अधिकारी आणि वैज्ञानिक सविस्तर अहवाल तयार करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सादर करणार असून त्यानंतर ठाण्यात हे केंद्र उभे राहिल असे बोलले जात आहे.
ठाण्यात विज्ञान केंद्र आणि प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. काकोडकर यांनी दिली.