वसईत रॅपिडो कंपनी विरोधात गुन्हा दाखल

वसई : परिवहन विभागाची परवानगी न घेता वसई-विरार शहरात रॅपिडो कंपनीच्या माध्यमातून खाजगी दुचाकी वाहनाद्वारे अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागाने कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वसई-विरार शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि विस्कळीत बससेवा यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींना समोरे जावे लागत होते. तसेच, रिक्षा थांब्यावर लागणाऱ्या लांबचलांब रांगा, अवाजवी दर यामुळे इच्छितस्थळी पोहोचताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे जलद प्रवास आणि कमी दर यामुळे रॅपीडोद्वारे पुरविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सी म्हणजे दुचाकी प्रवासी वाहतूक सेवेला नागरिकांकडून पसंती मिळत होती.

मात्र, बाईक टॅक्सी या सेवेला महाराष्ट्र राज्य शासनाने तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी दुचाकी वाहतुकीला कोणतीही परवानगी वा परवाना दिलेला नाही. तरीही संबंधित कंपनीने वसई विरार शहरात बाईक टॅक्सी विनापरवानगी व बेकायदेशीर ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा सुरु केली आहे. या कंपनीविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

रॅपिडोला परिवहन विभागाकडून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसून रॅपिडो द्वारे प्रवास न करण्याचे आवाहन वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.