पक्षीमित्राच्या सतर्कतेमुळे तांबट पक्ष्याला जीवनदान

ठाणे : मागील काही दिवसांत ठाण्याच्या तापमानात झालेल्या वाढीमुळे पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसू लागला आहे. अशातच ठाणे पूर्व पोस्ट ऑफिसजवळ निपचित पडलेल्या एका तांबट पक्ष्याला महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवदान दिले आहे. पक्ष्यांची योग्य सुश्रुषा करून त्याला त्याच्या अधिवासात सोडले आहे.

मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून देखील तो दिसत नाही. परंतु आता पानगळ हंगाम असल्यामुळे त्याचे दर्शन घडत आहे. दरम्यान ठाणे पूर्व मीठबंदर रोड पोस्ट ऑफिसजवळ, वाढत्या उष्म्याने हैराण झालेला तांबट पक्षी पडलेला आढळून आला. या पक्ष्यावर भूतदया दाखवत पोस्टमन अक्षय वाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद कोळी यांच्याशी संपर्क साधला. आनंद यांनी ही माहिती महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना दिली. तांबट पक्ष्याला भरत यांनी पाणी पाजून तत्काळ सुश्रुषा केली. थोड्या वेळात तांबट पक्ष्याला ताजेतवाने वाटल्यावर त्याला अधिवासात सोडले.

तांबट पक्ष्याचे तीन प्रकार असून कॉपर स्मिथ बारबेट, तपकिरी डोक्याचा तांबट (ब्राऊन हेडड बारबेट) आणि पांढ-या गालाचा तांबट (व्हाईट चिक बारबेट) असे प्रकार आढळून येतात. यापैकी कॉपर स्मिथ बारबेट मुंबई-ठाणे शहरात सर्वत्र आढळतो, तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रिय उद्यान तर पांढ-या गालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो. आपल्याकडे दिसणाऱ्या तांबट पक्ष्याला रसाळ फळे खायला आव़डते. काहीवेळा छोट्या किटकांवर तो ताव मारतो. एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो, परंतु सध्या पानगळीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवर बसलेला दिसतो, अशी माहिती पक्षी अभ्यासक मंदार बापट यांनी दिली आहे.

साधारण चिमणीच्या आकाराचा म्हणजे १९ सेमी लांबीचा हा पक्षी आहे. तांब्याच्या हंडीवर हातोड्याचा घाव घातल्यावर जसा आवाज येतो तशाच पद्धतीने हा ओरडतो, त्यामुळे स्थानिक भाषेत याला तांबट असे नाव पडले असावे असे सांगितलले जाते.