पुनर्रचनेच्या मागण्या ट्रॅकवर; रिंग मेट्रोला तूर्त रेड सिग्नल?

‘वेक अप ठाणेकर’च्या बैठकीत महामेट्रो अधिकाऱ्यांकडून संकेत

ठाणे : ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या मार्गाबाबत विविध भागांतून हरकतींचा पाऊस पडत असून नुकतीच आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ‘वेक अप ठाणेकर’ या नागरी संघटनेच्या शिष्टमंडळाने महा-मेट्रोचे अधिकारी सुरेश पाखरे यांची भेट घेतली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सल्लामसलती पूर्ण होईपर्यंत आणि पुनर्रचनेच्या मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत पुढील काम थांबविण्याचे संकेतही महा-मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले, अशी माहिती संघटनेने दिली.

ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या विविध प्रश्नांना आणि आक्षेपांना उत्तर मिळविण्यासाठी वेक अप ठाणेकर या संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महामेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रापासून वैधानिक मंजुरी, निविदा, प्रत्यक्ष कामाची सद्यस्थिती आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत विविध महत्त्वाचे प्रश्न लेखी स्वरूपात सादर केले.या प्रश्नांवर महा-मेट्रो आठवडाभरात लेखी उत्तर देईल आणि त्यानंतर संघटनेसोबत पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वेक अप ठाणेकर या संघटनेच्या शिष्टमंडळाने महा-मेट्रोसमोर विविध प्रश्न उपस्थित केले. सध्या महा-मेट्रोला कोणता डीपीआर, कोणती अलाइनमेंट, कोणते स्टेशन आणि कोणत्या स्वरूपाचा प्रकल्प प्रत्यक्षात राबविण्यास अधिकृत करण्यात आला आहे? सक्षम प्राधिकरणांनी मंजूर केलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या आराखड्यात नंतर काही बदल झाले आहेत का?, आवश्यक वैधानिक मंजुरी किती आणि कोणत्या मिळाल्या आहेत? जमीन संपादन, वनजमीन, कांदळवन, सीआरझेड, वृक्षतोड, वन्यजीव, ईएसझेड तसेच इतर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांशी संबंधित आवश्यक मंजुरींपैकी कोणत्या मंजुरी आजपर्यंत प्राप्त झाल्या आहेत? कोणत्या मंजुरी अद्याप प्रलंबित किंवा अटींसह आहेत? निविदा आणि कंत्राटांची सद्यस्थिती काय आहे? प्रत्यक्ष काम कितपत सुरू झाले आहे? सध्या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कोणती कामे सुरू आहेत? नागरिकांच्या आक्षेपांचा आणि पर्यायी अलाइनमेंटचा विचार कसा होणार? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. या आक्षेपांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी महा-मेट्रोकडे कोणती यंत्रणा आहे? अपरिवर्तनीय स्वरूपाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी पर्यायी मार्ग अथवा अलाइनमेंटमध्ये बदलांचा विचार करता येईल का? आणि असा निर्णय घेण्याचा अधिकार नेमक्या कोणत्या सक्षम प्राधिकरणाला आहे? आदी प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केले.

“महा-मेट्रो ही या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे; प्रकल्पाबाबत मूलभूत धोरणात्मक आणि आर्थिक निर्णय घेणारे प्राधिकरण नाही. त्यामुळे आमचा उद्देश महा-मेट्रोला विरोध करणे हा नसून, त्यांच्या कार्यक्षेत्राची आणि त्यांना मिळालेल्या अधिकारांची नेमकी माहिती मिळविणे हा आहे”, असे संघटनेचे दयानंद नेने यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या सार्वजनिक सल्लामसलती पूर्ण होईपर्यंत आणि नागरिकांनी सुचविलेल्या पुनर्रचनेच्या मागण्यांवर शासनाचा विचार पूर्ण होईपर्यंत पुढील अपरिवर्तनीय काम थांबवावे, अशी मागणी संघटनेने निवेदनात केली आहे. तसेच, ठाणे मेट्रोच्या विद्यमान मेट्रो मार्गिका ४ आणि ५ कार्यान्वित होण्यापूर्वी रिंग रूट मेट्रोच्या गरजेचे, संभाव्य पर्यायांचे आणि शहराच्या भविष्यातील वाहतूक आराखड्याचे पुनर्मूल्यांकन व्हावे, अशी भूमिकाही संघटनेने मांडली.