मनसे शहराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल
अंबरनाथ : खाजगी दुकानांच्या गाळ्याच्या मालकीवरून मनसे आणि भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली असून तक्रारदाराच्या फिर्यादीवरून मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर परिसरातील मारुती मंदिराजवळ मंगळवारी रात्री दोन गटात वादावादी झाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मीनारायण चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह इतर नऊ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे शहराध्यक्ष शिर्के यांना पोलिसांनी अटक केली. शिर्के यांना आज कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे यातील आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना दुकानात डांबून ठेवून फिर्यादी चौहान पत्नीच्या नावे असलेल्या दुकानात प्रवेश करून त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच प्रज्ञेश शिर्के याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. शैलेश शिर्के यांनी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान हाणामारीच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना देखील मारहाण करत त्यांचे चारचाकी वाहन पोलीस ठाण्याच्या समोर भाजप पदाधिकाऱ्यांनी फोडल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंबरनाथमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिर्के यांची चारचाकी फोडून मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातच मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली, असा सवाल श्री. जाधव यांनी उपस्थित केला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे करत आहेत.
फिर्यादीने खरेदी केलेल्या गाळ्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे समजते. गाळा रिकामा करण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. राजकीय पक्षीय वाद नव्हे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का याचा तपास असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.