भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली
ठाणे : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने एक दिवसात तब्बल १३० जणांचा चावा घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना ठाणे शहरासह जिल्ह्यात दिवसाकाठी १५० श्वान दंशाच्या घटना घडत असल्याचे उघडकीस आले आहे. दिवा येथील एक चिमुरडी रेबीजने दगावली, तर कल्याणच्या एका तरुणाने रेबीज होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची घटना यापूर्वी घडली असल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात सरकारी रुग्णालयांमध्ये रेबीज लस घेणार्यांची संख्या पाहिली असता रोज किमान १५० जणांना श्वान दंश होत असल्याचे समोर आले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर ते थेट शहापूर, मुरबाडपर्यंत जिल्ह्यात शहरीकरणाचा वेग वाढत चालला आहे. मात्र त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हा गंभीर मुद्दा बनत चालला आहे. गल्लीबोळांपासून सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांपर्यंत आणि मुख्य रस्त्यांपासून कचराकुंड्यांपर्यंत श्वानांच्या टोळ्या दिसत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा उपाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण खासगी ठेकेदारांकडून राबवण्यात येणार्या या उपक्रमावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाण्यासह इतर महापालिका श्वाननसबंदीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. पण तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांची संख्या सुमारे ४० ते ५० हजार असल्याचा अंदाज आहे. यापैकी निम्म्याहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. पुढील तीन वर्षांत हे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, नसबंदीचा वेग आणि प्रत्यक्ष श्वानसंख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येते.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुमारे ९० हजार भटके श्वान असल्याचा दावा करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांत ४८ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले. याच काळात तब्बल ५१ हजार नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. श्वानांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी याच कालावधीत चार कोटी २३ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या एका वर्षात ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ६२,५९७ श्वानदंशाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मार्च २०२६ मध्येच ६५८९ जणांवर उपचार करण्यात आले. सर्वाधिक ११,८४८ प्रकरणे उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये, तर त्याखालोखाल १०,६०८ प्रकरणे भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात नोंदली गेली आहेत.
रुग्णालयनिहाय श्वानदंशाच्या घटना
सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे: ५,११६, उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी: १०,६०८, उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ: ७,९३४, उपजिल्हा रुग्णालय, शहापूर: ४,०२०, ग्रामीण रुग्णालय, मालवणी: ३,७२०, ग्रामीण रुग्णालय, खार्डी: ६४७, ग्रामीण रुग्णालय, गोवेली: २,४२५, ग्रामीण रुग्णालय, अंबाडीपाटा: ५८९, ग्रामीण रुग्णालय, टोकावडे: २३७, सेंट्रल हॉस्पिटल, उल्हासनगर-३: ११,८४८, महिला रुग्णालय, उल्हासनगर-४: ८,५०४, ग्रामीण रुग्णालय, मीरा-भाईंदर: २,३४८, ग्रामीण रुग्णालय, मुरबाड: ५५८, उपजिल्हा रुग्णालय, बदलापूर: ४,०४३, एकूण: ६२,५९७