ठाण्यात पावसाचे आठ तासांत अर्धशतक

ठाणे : मागिल आठवडाभर तुरळक बरसणाऱ्या पावसाने आज पुन्हा जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मंगळवारी अवघ्या आठ तासांत ठाणे शहरात ५० मि.मी. पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर मागिल वर्षापेक्षा ७०० मि.मी. जास्त पाऊस पडला.

सकाळपासूनच शहरात पावसाची रीपरीप सुरु होती. सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान सुमारे १० मि.मी. पाऊस झाला होता. त्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजता पाऊस जोरदार बरसत होता. या पावसामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते, त्यामुळे शहराच्या विविध भागांतील चौकात वाहतूक कोंडी झाली होती. या पावसाने ठाणेकरांना जुलै महिन्यातील पावसाची आठवण करून दिली.

आज संध्याकाळी ६.३०पर्यंत ५१.५४ मि.मी. पाऊस झाला तर आतापर्यंत ठाणे शहरात २३४०.०६ मि.मी. पाऊस झाला. मागिल वर्षी याच काळात १६४४.२० मि.मी. पाऊस झाला होता.