जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांच्या ५२६ पदांची भरती

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या पवित्र (PAVITRA) पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाची ४९९ पदे तसेच उर्दू माध्यमाची २७ पदे, अशी एकूण ५२६ प्राथमिक शिक्षक पदे उपलब्ध करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषद, ठाणेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये नमूद केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, पात्रता निकष तसेच आरक्षणासंदर्भातील तरतुदी तपासणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी ४९९ आणि उर्दू माध्यमासाठी २७, अशी एकूण ५२६ प्राथमिक शिक्षक पदे उपलब्ध आहेत. संबंधित पदांसाठी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर आपला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.
पवित्र पोर्टलवर उपलब्ध जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी आपला पसंतीक्रम ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदवावा. निर्धारित अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्ज अथवा पसंतीक्रमाबाबत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता विहित कालावधीत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलवरील जाहिरात, पात्रता, पदांची माहिती, पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत सूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.