मेहा शाह आणि अद्विका मोरे बॅडमिंटन स्पर्धेत चमकले

ठाणे : योनेक्स-सनराईज शटल वॉर्स ठाणे जिल्हा ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा २०२६ नुकतीच कल्याण येथील आर.के.बी. च्या बॅडमिंटन कोर्टावर मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

ठाणे अकॅडमीची मेहा शाहने आक्रमक खेळ करत दोन वयोगटांत विजेतेपद मिळवून ‘ दुहेरी मुकूट पटकावला तसेच आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या वयोगटात देखील उपविजेतेपद पटकावून तिहेरी यश संपादन केले. १५ वर्षाखालील वयोगटाच्या अंतिम सामन्यात मेहा शाहने आपल्याच अकॅडमीच्या अद्विका मोरेचा १५-५, १५-६ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. त्यानंतर मुलींच्या १७ वर्षाखालील वयोगटात अंतिम फेरीत मेहाने रसिकाचा १५-४, १५-९ असा सहज पराभव करत दुहेरी मुकुट निश्चित केला. मुलींच्या १९ वर्षाखालील वयोगटात अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात रूतिकाविरुद्ध खेळताना मेहा शाहला १५-११, १५-१७, १५-७ अशा तीन गेमच्या लढतीत निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला आणि तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे, मुलींच्या १३ वर्षाखालील वयोगटात अकॅडमीच्या अद्विका मोरेने दिमाखदार कामगिरी नोंदवली. अंतिम सामन्यात अद्विकाने श्रीस्था दब्रालचा १५-१२, १५-१० असा पराभव करत विजेतेपदाचा चषक उंचावला. मुलींच्या १५ वर्षाखालील वयोगटात अंतिम फेरीत उपविजेतेपद मिळवून आद्विकानेही आपल्या प्रतिभेची छाप पाडली. मुलांच्या विभागात अकॅडमीच्या इतर खेळाडूंनीही कडवी झुंज दिली. मुलांच्या ११ वर्षाखालील वयोगटात अंतिम सामन्यात विहान गौडाने कियानविरुद्ध जोरदार लढा दिला. तीन गेमपर्यंत चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात विहानला ९-१५, १५-११, १३-१५ अशा निसटत्या पराभवाचा स्वीकार करावा लागला. तसेच मुलांच्या १३ वर्षाखालील वयोगटात अंतिम फेरीत देवम मिडगुलेने रुहानविरुद्ध संघर्ष केला, परंतु त्याला ४-१५, ८-१५ अशा फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ठाणे अकॅडमीच्या या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि अक्षय देवलकर, मितेश हजरनीस, मयूर घाटणेकर, कबीर कंझारकर आणि राजू गणपुले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.