ऐरोली नाट्यगृह, काटई उन्नत मार्ग सहा महिन्यांत खुला होणार

वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतला विकास कामांचा आढावा

नवी मुंबई: मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ऐरोली नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऐरोली ते काटई मार्गाच्या कामातील ऐरोली येथील उतार मार्गाचे काम देखील पूर्ण करण्यात आले असून हे दोन्ही प्रकल्प सहा महिन्यांत नागरिकांसाठी खुले करण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली येथील ऐरोली नाट्यगृह तसेच ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या कामाचा तसेच ऐरोली सेक्टर २० येथील निर्माणाधीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचा त्याचप्रमाणे तुर्भे ते खारघर अंडर बायपास कामाचा आढावा शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी घेतला.

या दौऱ्यात महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार, नगरसेवक अमित मेढकर, नगरसेवक शिवाजी खोपडे, नगरसेविका श्रेया जिरगे, नगरसेविका रेश्मा मढवी, नगरसेवक बंडू केणी आदी उपस्थित होते.

ऐरोली सेक्टर ५ येथे नवीन नाट्यगृहाची निर्मिती सुरू झाली. आता या नाट्यगृहाचे काम पूर्णत्वाकडे आले असून चार ते पाच महिन्यांमध्ये या नाट्यगृहाचे उद्घाटन होणार आहे. ऐरोली सेक्टर १० येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी वनमंत्री नाईक यांचा आमदार निधी देखील देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा प्रेरणादायी असून शिवकालीन शस्त्रे आणि आयुधाची माहिती देखील या ठिकाणी मिळणार आहे.

वनमंत्री नाईक यांच्या सूचनेनुसार या उन्नत मार्गावर नवी मुंबईकरांसाठी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन्ही दिशांनी मार्गिका तयार करण्यात येत आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी कमी करणारा जुईनगर ते खारघर भुयारी मार्गाची पाहणी केल्यानंतर या मार्गाचे काम उत्तम प्रकारे होत असल्याचे नाईक म्हणाले. तुर्भे ते खारघर टनेलचे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्याबरोबरच या प्रकल्पामुळे खारघरला जाण्यासाठी केवळ आठ मिनिटे लागणार आहेत. २०२८ पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड मा के नाम’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये ३०० कोटी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी वनमंत्र्यांनी दिली.

मोरबे धरण हे नवी मुंबईकरांसाठी आहे. धरणातील अतिरिक्त पाणी काही कालावधीसाठी इतर ठिकाणी देता येईल, परंतु नवी मुंबईकरांसाठी पाणीटंचाई निर्माण होईल किंवा त्यांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.