प्रवाशाकडून उकळले ५०० रुपये
कल्याण : हावड्याचे रेल्वे तिकीट देण्याच्या बहाण्याने १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर मार्करने ‘५’ हा अंक लिहून ते ५१० रुपयांचे तिकीट असल्याचे भासवत प्रवाशाकडून ५०० रुपये उकळल्याचा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला. तक्रार मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सारीकुल शेख (१८) हा बुधवारी सकाळी ११च्या सुमारास कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वरील तिकीट खिडकीसमोर उभा होता. त्यावेळी आरोपी अतुल अडलिंगे (३२, रा. सोलापूर) याने त्याच्याशी संपर्क साधला. हावड्याचे रेल्वे तिकीट मिळवून देतो, असे सांगून त्याने प्रवाशाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने त्याला १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट दिले. या तिकिटावर मार्करने ‘५’ हा अंक लिहून ते ५१० रुपयांचे तिकीट असल्याचे भासवले आणि प्रवाशाकडून ५०० रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी तातडीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.
या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी अतुल अडलिंगे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.